लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि. २९ (विठ्ठल ममताबादे)
उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित महिला भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हाभरातील १३ भजनी मंडळांनी भाग घेतला होता. उरणच्या जेएनपीए वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात सकाळी ९ वाजता सुरू झालेली स्पर्धा सायंकाळी ७ वाजेपर्यंत रंगली.
या वेळी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या कॅबिनेट मंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. “या भजन स्पर्धेतून आपण आपली परंपरा जोपासत आहोत, ही अतिशय आनंदाची बाब आहे. बक्षिसे कोणाला मिळतील यापेक्षा आज सादर होत असलेली प्रत्येक भजने आमच्या दृष्टीने सर्वोत्तम आहेत,” असे मत आदितीताईंनी व्यक्त केले.
त्यांनी पुढील वर्षी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्याची घोषणा केली, ज्यामुळे स्पर्धक व भजनप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक आई भवानी प्रासादिक भजन मंडळ, सांताक्रूझ पूर्व (गायिका कु. ऋतिका मुरूडकर), द्वितीय क्रमांक आई एकविरा महिला भजन मंडळ, दुंदरेपाडा (गायिका सुजाता पाटणकर), तृतीय क्रमांक ओम साई भजन मंडळ, खरसुंडी खालापूर (गायिका हर्षदा सालेकर) यांनी पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिक श्री. कृष्ण प्रासादिक भजन मंडळ, कुडूस अलिबाग (गायिका पूजा पाटील) यांना मिळाले.
उत्कृष्ट तबलावादक म्हणून ओमकार कराळे तर उत्कृष्ट गायिका म्हणून पुनम आगरकर यांची निवड झाली. परीक्षक म्हणून माऊली सावंत, ओम बोंगाडे आणि भाग्यश्रीताई देशपांडे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका अध्यक्ष परिक्षित ठाकूर, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, माजी सदस्या कुंदाताई वैजनाथ ठाकूर, माजी अध्यक्ष मनोज भगत, शहर अध्यक्ष तुषार ठाकूर, उपाध्यक्ष सुमिता तुपगावकर, श्री गुरुकृपा संगीत परिवारचे सुप्रिया घरत, तुषार घरत आदींनी परिश्रम घेतले.
पहिल्यांदाच उरण तालुक्यात झालेल्या या भजन स्पर्धेमुळे भजन प्रेमी व अध्यात्मिक वातावरण भारावून गेले होते.