लोकदर्शन राजुरा 👉मोहन भारती
राजुरा : गुरूदेव नगर वार्ड, धोपटाळा, तहसील राजुरा येथील रहिवासी प्रा. प्रफुल्ल राजेश्वर शेंडे यांनी महाराष्ट्र शासनामार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दिनांक १५ जून २०२५ रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) मध्ये मराठी विषयात उल्लेखनीय यश संपादन करून प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळवली आहे.
या परीक्षेत ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत फक्त ६.६९ टक्के उमेदवारच पात्र ठरले. त्यात २०१५-१६ मध्ये राज्यशास्त्र विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रा. शेंडे यांनी तब्बल १० वर्षांनंतर दुसऱ्याच प्रयत्नात मराठी विषयातही पात्रता संपादन केली आहे. ३० ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांचे नाव पात्र उमेदवारांमध्ये घोषित करण्यात आले.
प्रा. शेंडे यांनी प्राथमिक शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, गडीसुर्ला येथे घेतले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण जिल्हा परिषद ज्युनिअर कॉलेज, राजुरा, पदवी श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा, तसेच सन २००५ मध्ये एम.ए. (मराठी) – एस.पी. कॉलेज, चंद्रपूर, आणि बी.एड. – जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर येथे पूर्ण केले. सन २००६ पासून ते विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्राध्यापक तसेच कार्यकारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे ते चार विषयांमध्ये एम.ए. पदवीधर आहेत.
मागील १५ वर्षांपासून त्यांनी पत्रकारिता, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आपल्या यशाचे श्रेय प्रा. शेंडे यांनी आजी-आजोबा, आई-वडील, कुटुंबीयांचे आशीर्वाद, पत्नी सौ. सुषमा प्रफुल्ल शेंडे, मुलगा प्रसून यांचे सहकार्य तसेच विविध महाविद्यालयांतील सहकारी प्राध्यापकांचे मार्गदर्शन यांना दिले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, मित्रपरिवाराकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.