नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा वाद उच्च न्यायालयात ♦️केंद्र सरकारची भूमिका ठरणार निर्णायक, प्रकल्पग्रस्तांची अपेक्षा वाढली

उरण (लोकदर्शन प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे):

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीवरून सुरू असलेला दीर्घकालीन वाद अखेर मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या संदर्भात प्रकाशझोत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विकास परशुराम पाटील यांनी केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, सिडको, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लि. तसेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.

विमानतळाच्या नामकरणाबाबत राज्य सरकारने आधीच “लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” या नावाला मंजुरी देत ठराव केंद्राकडे पाठविला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अंतिम निर्णय न झाल्यामुळे प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक समाजात नाराजीचे वातावरण आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा पुरस्कार करत सातत्याने आंदोलन व पाठपुरावा केला आहे. विमानतळ उद्घाटनाची तारीख जवळ आली तरी नामकरणाचा प्रश्न जैसे थे असल्याने प्रकल्पग्रस्तांनी अखेर कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे.

न्यायालयीन सुनावणीत विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यायचे ठरले असल्यास त्यासंदर्भातील सर्व पत्रव्यवहार केंद्र व राज्य सरकारला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे या प्रश्नावर केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट होणे आता अपरिहार्य ठरणार आहे.

या घडामोडींमुळे नामकरणाचा लढा आणखी तीव्र झाला असून, “स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त व लोकनेते दि. बा. पाटील यांचे समर्थक यांच्या नजरा आता केंद्र सरकारच्या निर्णयाकडे लागल्या आहेत” असे चित्र निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here