लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि. २५ (विठ्ठल ममताबादे) : नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्याचा समावेश असलेला खान्देश हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा भाग. खान्देशातील नागरिक शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशविदेशात स्थलांतरित झाले असून, समाजकारण व विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. रायगड जिल्हा व नवी मुंबई परिसरातही खान्देशातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.
या नागरिकांना एकत्र आणणे, परस्परांची ओळख वाढवणे, सुख-दुःखात सहभागी होणे तसेच खान्देशी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या कान्हादेश (खान्देश) मित्र मंडळ उरण विभाग, नवी मुंबई तर्फे भव्य मेळावा, सत्यनारायण महापूजा व स्नेहभोजन कार्यक्रम करंजा रोडवरील भारती बॅंक्वेट हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
सकाळी ९ ते १० सत्यनारायण पूजा, त्यानंतर नृत्य, गायन व वकृत्व स्पर्धा तसेच दुपारी स्नेहभोजन अशा विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी कार्यक्रम रंगतदार झाला. या मेळाव्याला महाराष्ट्रातील विविध भागांतील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये लहास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुलाबराव जाधव, नवजिवन लोकविकास संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील, मराठा सेवा संघ कल्याणचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, सुप्रसिद्ध गायक विनोद चौधरी (बेलापूर), आरोग्य सेवा भिवंडीचे अध्यक्ष कैलास पाटील, खान्देश मित्र मंडळ ठाणेचे उपाध्यक्ष शांताराम पाटील, उद्योजक विकास पाटील, डॉ. चेतन पाटील (पनवेल) यांचा समावेश होता. मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी मेळाव्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चित्ते, कार्याध्यक्ष सुनील चौधरी, उपाध्यक्ष आनंद कुमावत व कैलास भामरे, खजिनदार वामन राठोड, सहखजिनदार संजय पाटील व भरत पाटील, सेक्रेटरी सचिन खैरनार, कार्याध्यक्ष डॉ. विजय देवरे, सहसेक्रेटरी ईश्वर माळी व संदीप पाटील, सदस्य भगवान राठोड आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
नागरिकांनी या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत खान्देशी संस्कृती, परंपरा व आचारविचारांचा अनुभव घेतला. उत्कृष्ट आयोजनामुळे असा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.