राजुर्यात जन्माष्टमी जल्लोष : दहीहंडी स्पर्धेत बल्लारपूरचा श्रीराम आखाडा प्रथम, राजुराच्या मुलींच्या पथकाला द्वितीय क्रमांक

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा (ता.प्र.): श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शनिवारी राजुरा शहरात पारंपरिक दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. जुन्या बसस्टॉप परिसरातील भारत लॉज जवळ सायंकाळी ७.३० वाजता रंगलेल्या या सोहळ्याने शहरात भक्ती, आनंद आणि युवाशक्तीचा महासागर उसळवला.

या भव्य सोहळ्याचे आयोजन शिवमंदिर सोनिया नगर व शिवाज्ञा वाद्य पथक यांच्या वतीने करण्यात आले होते. प्रमुख संयोजक राजुरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे होते. त्यांनी तरुणांच्या उत्साहाला ऊर्जा देत दरवर्षी जन्माष्टमी निमित्त भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाला चिमुरचा छोकरा आशीष बोबडे आणि सप्पुदादा स्वप्नील वाग्दरकर यांची विशेष उपस्थिती नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. वाद्य पथकाचे सूर, *“गोविंदा रे गोपाळा”*चे गजर आणि युवकांची थरारक धडपड यामुळे परिसर दणाणून गेला.

या स्पर्धेत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.

प्रथम क्रमांक (₹३१,००० रोख व सन्मानचिन्ह): श्रीराम बालक आखाडा, बल्लारपूर (मुलांचे पथक)

द्वितीय क्रमांक (₹२१,००० रोख व सन्मानचिन्ह): शिवशाही दहीहंडी पथक, राजुरा (मुलींचे पथक)

सोहळ्यास माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी पंचायत समिती सभापती कुंदाताई जेणेकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, माजी नगरसेवक हरजीतसिंग संधू, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, महिला शहराध्यक्षा संध्याताई चांदेकर, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

उत्सव यशस्वी करण्यासाठी रवींद्र (आरपी) आत्राम, पियुष मामीडवार, अश्विनदादा बावनकर, आकाश यादव यांच्यासह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र आत्राम, सूत्रसंचालन अंकुश चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन पियुष मामीडवार यांनी मानले.

नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने हा दहीहंडी उत्सव राजुर्यातील अविस्मरणीय सोहळा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here