लोकदर्शन. चंद्रपूर 👉मोहन भारती
चंद्रपूर, दि. 14 :ऑगस्ट
बल्लारपूरच्या विकास प्रवासात ऐतिहासिक पाऊल टाकत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाचे नियमन करून 210 पात्र लाभार्थ्यांना घराचे पट्टे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमातून भविष्यातील सुमारे 12 हजार लाभार्थ्यांना हक्काचे घरपट्टे देण्याच्या महाअभियानाची भक्कम नांदी झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
बल्लारपूर नाट्यगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे, शहराध्यक्ष रणजंय सिंग, समीर केने, जयश्री मोहूर्ले, राजू दारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, तहसीलदार रेणुका कोकाटे, उपअधीक्षक भूमि अभिलेख अनिल देशमुख, अग्निशमन अधिकारी शुभम रत्नपारखी, नायब तहसीलदार श्री. फुलझेले आदी मान्यवर उपस्थित होते.
“मतदारसंघ विकासात सदैव आघाडीवर”
आमदार मुनगंटीवार म्हणाले, “माझा मतदारसंघ प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी राहावा यासाठी अत्याधुनिक सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, नगरपरिषदेची नवीन इमारत, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, स्व. विपिन रावत यांच्या नावाने जिम, क्रीडा संकुल, अभ्यासिका, सिमेंट रस्ते, छटघाट व विविध बगीचे अशा अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत.”
त्यांनी सांगितले की, एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या बल्लारपूर केंद्रात 62 कोर्सेस सुरू होणार आहेत, ज्यामुळे बहिणींना उच्च शिक्षणाच्या संधी वाढतील. तसेच स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राद्वारे महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देत रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
12 हजार कुटुंबांसाठी नवा अध्याय
बल्लारपूरमधील सुमारे 12 हजार कुटुंबांना हक्काच्या जमिनीअभावी शासकीय योजना व बँक कर्जापासून वंचित राहावे लागते. झुडपी जंगल कायद्यात बदल घडवून आणण्यासाठी लवकरच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार आहे. 210 पट्ट्यांचे हे वाटप केवळ सुरुवात असून, लवकरच 12 हजार घरपट्ट्यांच्या महाअभियानातून अनेक कुटुंबांना कायमस्वरूपी दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.