कोरपना उड्डाण पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची जोरदार मागणी ♦️फुले–आंबेडकरवादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक एकत्र; संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात विशेष महत्त्व

लोकदर्शन कोरपना👉अशोककुमार भगत

कोरपना (चंद्रपूर) –
कोरपना येथे नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाला भारतरत्न, संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी जोरदार मागणी परिसरातील फुले–आंबेडकरवादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन ११ ऑगस्ट २०२५ रोजी निवासी जिल्हाधिकारी, चंद्रपूर तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) च्या प्रकल्प संचालकांना सादर करण्यात आले.

पूर्ण झालेले आणि वाहतुकीसाठी खुले असलेले हे उड्डाण पूल महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात निजाम राज्य असलेल्या तेलंगणाला भारतीय संघराज्यात सामावून घेण्यात डॉ. आंबेडकर यांचे अमूल्य योगदान होते. या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे पुलाला त्यांचे नाव देणे हा त्यांच्या कार्याचा गौरव ठरेल, असे निवेदनात नमूद आहे.

संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष – मागणीला उभारी
सध्या भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. “संविधानाचे रक्षण व प्रचारासाठी अशा स्मृतीचिन्हांची गरज आहे,” असे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यामुळे या मागणीला विशेष उभारी मिळाली आहे.

संघटनांचा एकजूट मोर्चा
या मागणीमागे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोमाजी गोंडाने, शिक्षक संघटनेचे राजू मेश्राम, तालुका सल्लागार मधुकर चुनारकर, भीम आर्मीचे मदन बोरकर, विजय जीवने, नगरसेवक मनोहर चन्ने, शौकत अली, आदिवासी नेते प्रभाकर गेडाम, ओबीसी नेते हरिदास गौरकार, शुद्धधन भगत, बौद्धाचार्य श्रावण जीवने, बादल चांदेकर यांसह अनेक मान्यवरांची सह्या आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन मागणीला ताकद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here