लोकदर्शन👉मोहन भारती
मुंबई, दि. 13 ऑगस्ट –
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना (अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब) अन्नधान्याचे वितरण करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिन रकमेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. ही माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
मार्जिन दरात ₹२०/- प्रति क्विंटल वाढ
सध्या रास्त भाव दुकानदारांना ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्याच्या वितरणासाठी ₹१५०/- प्रति क्विंटल (₹१५००/- प्रति मेट्रिक टन) मार्जिन दिले जाते. आता त्यात ₹२०/- प्रति क्विंटल वाढ करून ₹१७०/- प्रति क्विंटल (₹१७००/- प्रति मेट्रिक टन) इतके मार्जिन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे ₹९२.७१ कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण
गेल्या अनेक महिन्यांपासून रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिन वाढवण्याची मागणी सुरू होती. अनेक बैठका झाल्यानंतर सरकारने सकारात्मक भूमिका घेत, अखेर मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय मंजूर केला.
“सरकार रास्त भाव दुकानदारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक होते, त्यामुळे त्यांचे मार्जिन वाढवून दिले आहे,” असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
लोकदर्शन सकारात्मक लोकजागर