मतदार चोरीविरोधात रायगड काँग्रेसची हाक — 14 ऑगस्टला अलिबाग येथे कॅन्डल मार्च व मशाल मोर्चा

लोकदर्शन उरण, 👉विठ्ठल ममताबादे

उरण, दि. 13 (विठ्ठल ममताबादे) – मतदार यादीतील कथित घोटाळे व मतदार चोरीच्या आरोपांवर काँग्रेस पक्षाने प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्णय घेतला असून, 14 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर कॅन्डल मार्च व मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप करताना, निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार याद्यांमध्ये फेरफार करून गैरमार्गाने सत्ता हस्तगत केल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.

रायगड जिल्ह्यातील हे आंदोलन गुरुवार, 14 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता अलिबाग येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत होणार आहे. या मोर्चात “मतदान चोर, खुर्ची सोड” असा नारा देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा व ब्लॉक अध्यक्ष, महिला आघाडी, युवक काँग्रेस, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर व श्रद्धा ठाकूर यांनी सर्व कार्यकर्त्यांना आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here