By : Shankar Tadas
कोरपना / सोनुर्ली
बंधुत्व, प्रेम व स्नेहभावनेचे प्रतीक असलेला रक्षाबंधन उत्सव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोनुर्ली येथे आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक बाळा बोढे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. विषय शिक्षक विजय राऊत, शिक्षिका प्रभावती हिरादेवी, मेनका मुंडे, शिक्षक सुनिल आलोने व शिक्षणप्रेमी पल्लवी कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात रक्षाबंधनाच्या इतिहास व महत्त्वावरील माहितीपर भाषणाने झाली. त्यानंतर विद्यार्थिनींनी भावांना राखी बांधून त्यांचे दीर्घायुष्य, सुख-समृद्धी व यश यासाठी शुभेच्छा दिल्या. काही विद्यार्थ्यांनी तिरंगा राखी सादर करून ‘हर घर तिरंगा’ अभियानालाही जोड दिली.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार केलेल्या विविधरंगी राख्यांनी कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण दिले. या निमित्ताने बंधु-भगिनींमधील प्रेम, आदर व परस्पर जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली.
ग्रामस्थांनी व पालकांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सहभागाचे व शिक्षकांच्या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे मुलांमध्ये मूल्यसंस्कार, सामाजिकता व स्नेहभावनेची जपणूक होते, असे ग्रामस्थांनी नमूद केले.