“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यात 54 वा आंतरजातीय सत्यशोधक विवाह सोहळा” “♦️विचारांचा विवाह! पुण्यात 6 ऑगस्ट रोजी सत्यशोधक पद्धतीने आंतरजातीय विवाह सोहळा” —


लोकदर्शन पुणे👉रंगनाथ ढोके

पुणे | दिनांक ६ ऑगस्ट २०२५ —
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त फुले–शाहू–आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने पुण्यातील राजयोग प्लाझा सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, बहुद्देशीय सत्यशोधक केंद्र येथे एक अत्यंत प्रेरणादायी आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा सोहळा — ५४ वा आंतरजातीय सत्यशोधक विवाह संपन्न होणार आहे.

हा विवाह सोहळा सत्यशोधक लक्ष्मण सुरेश पांचाळ (हैदराबाद) आणि सत्यशोधिका तेजश्री गुलाब शेंडगे (बार्शी, सध्या पुणे) यांचा असून, महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक पद्धतीने, संस्थेचे अध्यक्ष आणि महात्मा फुले चरित्र साधना साहित्य व प्रकाशन समितीचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत पार पडणार आहे.

या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा. सुदाम धाडगे हे महात्मा फुले रचित मंगळाष्टकाचे सादरीकरण करणार असून, त्यांच्या वतीने वधू-वरांना संसारोपयोगी भांडी भेट म्हणून दिली जाणार आहेत.

विवाह सोहळ्याच्या प्रारंभी वधू-वरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी पारंपरिक अक्षता ऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात येईल.

संस्थेच्या वतीने वधू-वरांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रेरणादायी प्रतिमा भेट दिली जाईल. वधू-वरांचे पालकसुद्धा या सोहळ्यात उपस्थित राहणार असून, त्यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र प्रदान केले जाणार आहे.

सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी माहिती देताना सांगितले की, हे वधू-वर अल्पशिक्षित असले तरी त्यांनी महापुरुषांच्या विचारांना अनुसरून आई-वडिलांच्या संमतीने आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला, हीच खऱ्या अर्थाने समाजप्रबोधनाची आणि परिवर्तनाची दिशा आहे.

त्यांनी समाजाला आवाहन केलं की, या वधू-वरांना वस्तुरूपात मदत किंवा आशीर्वाद देण्याची इच्छा असल्यास, विवाहस्थळी प्रत्यक्ष भेटवस्तू सादर करून सहकार्य करावे. विवाहाचा संपूर्ण खर्च संस्थेच्या वतीने केला जाणार आहे.

गेल्या पाच वर्षांत संस्थेच्या वतीने महाराष्ट्र व तेलंगणामध्ये एकूण ५३ सत्यशोधक विवाह आणि १४ गृहप्रवेश सोहळे समाजप्रबोधनाच्या ध्येयाने संपन्न करण्यात आले असून, हा पुण्यातील सत्यशोधक केंद्रातील ८ वा विवाहसोहळा ठरणार आहे.

✍️ लोकदर्शन साठी विशेष प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here