✍️ लोकदर्शन वार्ताहर : गुरुनाथ तिरपणकर | डोंबिवली
डोंबिवली : जनतेच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून त्या तत्काळ सोडविण्याचे व नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याचे कार्य प्रामाणिकपणे 34 वर्षे बजावणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील उप अभियंता विजयकुमार विसपुते यांचा नुकताच नागरी सन्मान करण्यात आला.
सेवानिवृत्तीपूर्व संध्येला नेहरू रोड बचाव संघर्ष समितीच्या वतीने आयोजित हा सत्कार सोहळा डोंबिवली सारस्वत कॉलनी येथे पार पडला. या कार्यक्रमात ‘डोंबिवली भूषण’ पद्मश्री सन्मानित गजानन माने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विसपुते यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी महापालिकेचे कार्यकारी अभियंता मनोज सांगवे, सहकारी अवधूत मदन, नाख्ये, तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. मृदुला कुलकर्णी यांनी केले.
यावेळी प्रभाकरन, इंगवले, जंगम, निषाद पाटील, श्रीपाद कुलकर्णी, सौ. श्रुती उरणकर यांच्यासह अनेक महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयकुमार विसपुते यांची प्रामाणिक सेवा, कर्तव्यनिष्ठ वृत्ती आणि सार्वजनिक हितासाठी दिलेले योगदान हे नव्या पिढीला प्रेरणादायी ठरत राहील, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.