लोकदर्शन 👉 मोहन भारती
गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनने विद्यार्थ्यांच्या हितासाठी शैक्षणिक सत्र 2025–26 पासून ‘कॅरी फॉरवर्ड’ योजना लागू करण्याची ठोस मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ. विवेक गोर्लावार यांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याशी भेट घेऊन अधिकृत मागणीपत्र सादर केले.
मागील दोन शैक्षणिक सत्रांमध्ये (2023–24 व 2024–25) विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड पद्धतीने प्रवेशाची सवलत देण्यात आली होती, ज्याचा विद्यार्थ्यांना, महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला व्यापक शैक्षणिक लाभ झाला होता. या धोरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आणि त्यांना शिक्षणाची सातत्याने संधी मिळाली.
विशेषतः अमरावती विद्यापीठ आणि गोवा विद्यापीठ यांनीही यंदा 100% कॅरी फॉरवर्ड योजना राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देत, गोंडवाना विद्यापीठानेही तात्काळ याच धर्तीवर धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी संघटनेची मागणी आहे.
गोंडवाना विद्यापीठांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी ग्रामीण, आदिवासी, डोंगराळ आणि नक्षलप्रभावित भागातून येणारे असून, त्यांना सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींमुळे वेळेवर परीक्षा देणे किंवा पास होणे अवघड जाते. परिणामी, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते आणि शिक्षणात खंड पडतो.
याशिवाय, महाविद्यालयांमध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असून, त्यातही विद्यार्थ्यांचे अपयशाचे प्रमाण अधिक असल्याने महाविद्यालयांवरील आणि विद्यापीठाच्या आकडेवारीवरही परिणाम होत आहे.
“कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हे विद्यापीठाचे नैतिक व शैक्षणिक कर्तव्य आहे,” असा ठाम मतप्रदर्शन संघटनेकडून करण्यात आले असून, यासाठी कॅरी फॉरवर्ड योजना पुनश्च लागू करावी, अशी जोरदार मागणी यंग टीचर्स असोसिएशनने केली आहे.