लोकदर्शन मुंबई👉मोहन भारती
मुंबई / नागपूर | २५ जुलै २०२५
मंत्रालय, मुंबई येथून प्राप्त झालेल्या हवामान विभागाच्या ताज्या इशाऱ्यानुसार, पुढील २४ तासांत विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, नद्यांमध्ये पाणीपातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता निचांकी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून, शाळा, महाविद्यालयांना आवश्यकता भासल्यास सुट्टी जाहीर करण्यात येऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. मात्र पुढील काही तासांमध्ये हवामानात आकस्मिक बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणांनी खबरदारीचे उपाय तातडीने राबवावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.