लोकदर्शन वालुर |👉महादेव गिरी
वालुर येथील माळी गल्ली येथे संत श्री सावता महाराजांच्या ७३० व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्ताने दि. १६ जुलै ते २३ जुलै दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. हा सप्ताह श्री संत सावता महाराज मंगल कार्यालयात, सरपंच संजय साडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला.
या हरिनाम सप्ताहात दररोज भाविकांनी सहभागी होऊन विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचा आनंद घेतला.
दैनंदिन कार्यक्रमांमध्ये सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ९ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, ६ ते ७ हरीपाठ आणि रात्री ९ ते ११ कीर्तन असे कार्यक्रम झाले.
🗣️ प्रमुख किर्तनकारांची मनोवेधक प्रवचने आणि कीर्तने
सप्ताहभर विविध भागांतील कीर्तनकारांनी आपले संतवाङ्मय, अध्यात्म आणि भक्तिरसपूर्ण विचार भाविकांपर्यंत पोहोचवले.
दि.१६ जुलै: ह.भ.प. कृष्ण महाराज रासवे
दि.१७ जुलै: ह.भ.प. माऊली महाराज चव्हाण (सेलुकर)
दि.१८ जुलै: महादेव महाराज राऊत (बीड)
दि.१९ जुलै: सद्गुरू नामदेव महाराज (चारठाणकर)
दि.२० जुलै: ह.भ.प. पंकज महाराज थोरे (देवनांद्रा)
दि.२१ जुलै: ह.भ.प. शंतनु महाराज पाठक
दि.२२ जुलै: सकाळी श्री १००८ महामंडलेश्वर मनीषानंद पुरीजी महाराज यांचे प्रवचन
आणि रात्री ह.भ.प. राघव चैतन्य स्वामी महाराज यांचे कीर्तन
🚩 संत पालखी व काल्याचे किर्तन – सप्ताहाची गौरवशाली सांगता
दि.२३ जुलै रोजी, सप्ताहाची सांगता श्री संत सावता महाराज पालखी सोहळा व दिंडी मिरवणुकीने झाली.
सकाळी ११ ते १ या वेळेत परमहंस परिव्राजकाचार्य श्री १००८ स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन भव्य भाविकांच्या उपस्थितीत पार पडले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, ज्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.
या अखंड हरिनाम सप्ताहामुळे संपूर्ण गावात भक्तीचा माहोल निर्माण झाला होता. भाविकांच्या एकनिष्ठ सहभागामुळे सोहळ्याला विशेष उंची प्राप्त झाली.
🚩 लोकदर्शन सकारात्मक लोकजागर
(प्रतिनिधी – वालुर)👉महादेव गिरी