लोकदर्शन उरण👉विठ्ठल मामातबादे
उरण, १८ जुलै (वार्ताहर – विठ्ठल ममताबादे)
महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून न्याय्य हक्क मिळावा, या मागणीसाठी सकल लिंगायत समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी, नवी मुंबई येथे भव्य निषेध आंदोलन करण्यात आले.
राज्यात इतर समाजांसाठी स्वतंत्र महामंडळे स्थापन करून मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र लिंगायत समाजासाठी ‘जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ’ हे केवळ उपकंपनी स्वरूपात तयार करून ओबीसी प्रवर्गातील ५% लोकांपुरता मर्यादित लाभ दिला जात आहे. उर्वरित ९५% लिंगायत समाज खुल्या (ओपन) प्रवर्गात येतो, ज्यांना या महामंडळाचा कोणताही लाभ मिळत नाही.
लिंगायत समाजाच्या विविध उपजाती — हिंदू-लिंगायत, लिंगायत वाणी, जंगम, तेली, माळी, पंचम, बनजगे यांना देखील या महामंडळाचा लाभ मिळावा यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी आंदोलकांनी केली.
सध्या या उपकंपनीसाठी केवळ ₹५० कोटींची तरतूद असून ती अपुरी आहे. हा निधी वाढवून किमान ₹५०० कोटी करावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनीही हा विषय अनेक वेळा सभागृहात मांडलेला असतानाही सरकारने अद्याप योग्य तो निर्णय घेतलेला नाही. यामुळे लिंगायत समाजात सरकारविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
यावेळी आंदोलनस्थळी महेश कोटीवाले, सिद्धाराम शिलवंत, नीलकंठ बिजलगावकर, आनंद गवी, राम लिंगया, सुनील पाटील, अशोक बिराजदार, शंकर संकपाळ, शशी बबलाद, चंद्रशेखर स्वामी, महांतेश बुक्का, स्मिता दमामे, सुवर्णा भद्रे, सुरेखा कोटीवाले, ऐश्वर्या बद्रे, गीता शिलवंत, बिराण्णा बिराजदार, रमेश बैरामडगी, सुनील स्वामी यांच्यासह लिंगायत समाजातील मोठ्या संख्येने बंधू-भगिनी सहभागी झाले होते.
आगामी काळात जर लवकर निर्णय न झाल्यास, हे आंदोलन अधिक तीव्र करून संपूर्ण महाराष्ट्रभर राबवले जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
✍️ वार्ताहर – विठ्ठल ममताबादे
लोकदर्शन सकारात्मक लोकजागर