📰 लोकदर्शन न्यूज पुणे 👉
✍️ रंगनाथ ढोक
पुणे | ६ जुलै २०२५
हिंदी साहित्य व शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या जेष्ठ लेखिका, अभ्यासक व समाजसेविका डॉ. दुर्गा विश्वनाथ दीक्षित (वय ८६) यांचे दि. ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीच्या पहाटे ४.३० वाजता पुणे येथे दु:खद निधन झाले. त्या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या.
डॉ. दीक्षित यांनी किशोर वयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून सुरू केलेली शैक्षणिक कारकीर्द सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुखपदापर्यंत नेतली. १९६२ साली त्या इंग्रजी आणि हिंदी विषयात विद्यापीठात प्रथम आल्या होत्या आणि १९७० मध्ये त्यांनी हिंदी विषयात पीएच.डी. पूर्ण केली होती. त्या पुण्यातील हिंदी व संस्कृत शिकवणाऱ्या पहिल्या महिला शिक्षकांपैकी एक होत्या.
डॉ. दीक्षित यांनी आपल्या सेवानिवृत्तीनंतर “ऐक्यभारती रिसर्च इन्स्टिट्यूट” आणि “ऐक्यभारती प्रतिष्ठान” या संस्थांची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी संशोधन, परिषदांचे आयोजन, कौशल्यविकास अभ्यासक्रम, महिलांसाठी शिबिरे, आणि तरुणांसाठी बहुभाषिक वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या. त्यांनी दलित नाट्य संमेलन, महाराष्ट्र लोकसाहित्य परिषद यासारख्या उपक्रमांतही सक्रिय सहभाग घेतला.
त्यांचे “रससिद्धान्त का सामाजिक मूल्यांकन”, “नाटक और नाट्यशैलियाँ”, “महाराष्ट्र का लोकधर्मी नाट्य”, “हिंदी रंगमंच का अलक्षित संदर्भ” यांसारखे साहित्यप्रमुख ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. “डायमंड महाराष्ट्र संस्कृती कोश” आणि “माझा भारत – आपला भारत” हे त्यांचे ग्रंथ अमेझॉनवर मराठी व हिंदीतून उपलब्ध आहेत.
समाजसेवक रघुनाथ ढोक लिखित “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले” या मराठी ग्रंथाचा हिंदी अनुवाद त्यांनी मोफत करून दिला होता. तसेच त्यांनी १९६८ मधील महात्मा फुले यांचे दुर्मिळ वाड्मय देखील रघुनाथ ढोक यांना भेट दिले. त्यांचे “संत वाड्मय की सामाजिक फलश्रुती” हे महत्त्वाचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
इटलीच्या ओरिएंटल युनिव्हर्सिटी, नेपल्स येथे त्यांची भारत सरकारकडून हिंदी अध्यापनासाठी नियुक्ती झाली होती. त्या महाराष्ट्र हिंदी परिषदच्या संस्थापक अध्यक्षा, भारत सरकारच्या राजभाषा समिती सदस्य, आणि फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल फाउंडेशनच्या मार्गदर्शिका होत्या. त्यांना बिहार राष्ट्रभाषा परिषदेसह अनेक संस्थांनी सन्मानित केले होते.
त्यांच्या पश्चात दोन भाचे – विक्रम व विवेक विजय दाते असून, त्यांनी दीर्घकाळ त्यांची सेवा मनोभावे केली.
हिंदी साहित्यातील एक तेजस्वी दीप मालवला गेला आहे. त्यांच्या कार्याला, संशोधनाला आणि समाजहितासाठी दिलेल्या योगदानाला लोकदर्शन परिवार कृतज्ञतापूर्वक सलाम करतो.