📰 लोकदर्शन न्यूज पोर्टल
✍️ प्रतिनिधी : मोहन भारती
मुंबई | ७ जुलै २०२५
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूरचे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून मुल शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या बस आगार प्रकल्पाला गती मिळू लागली आहे.
आज विधानभवन, मुंबई येथे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीस डॉ. माधव कुशेकर (उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक), श्री. दिनेश महाजन (जनरल मॅनेजर, बांधकाम), श्री. नितीन मैंद (व्यवस्थापक, वाहतूक) आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली होती.
या बैठकीत मुल बस आगाराच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडथळ्यांवर, जागेच्या ताब्याबाबतच्या प्रक्रियेतल्या अडचणींवर आणि विविध शासकीय विभागांमधील समन्वयावर सविस्तर चर्चा झाली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाला तात्काळ गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
मुल तालुक्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, अनेक वर्षांपासून रखडलेला बस आगार प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने जात आहे. या सर्व घडामोडीमागे आ. सुधीर मुनगंटीवार यांचा सततचा आग्रह, जनतेप्रती बांधिलकी आणि विकासाभिमुख दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो.
गडचांदूर व कोरपना येथेही बसस्थानकाची गरज तीव्र
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर असलेले गडचांदूर आणि तेलंगणाच्या सीमेवर वसलेले कोरपना तहसील — या दोन्ही ठिकाणी आजही स्वतःची स्वतंत्र बसस्थाने उपलब्ध नाहीत. या भागांमधून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते.
स्थानिक नागरिकांच्या मते, येथे स्वतंत्र बस स्थानकांची अत्यंत गरज असून, मुलप्रमाणेच गडचांदूर व कोरपना येथेही परिवहन विभागाने लक्ष द्यावे, अशी जनतेची प्रबळ अपेक्षा आहे.