लोकदर्शन प्रतिनिधी, पुणे
पुणे | 1 जुलै 2025
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, पुणे येथील वरिष्ठ लिपिक योगेश दत्तात्रय चवंडके (वय 37 वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी 1500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदार (वय 58 वर्षे) यांचा 2022 मध्ये झालेल्या मोटार अपघातानंतर विमा कंपनीने नुकसान भरपाई नाकारली होती. त्यांनी याविरोधात जिल्हा ग्राहक आयोगात अपील दाखल केले होते. मात्र, सुनावणीच्या दिवशी फाईल गहाळ असल्याचे सांगून चवंडके यांनी फाईल सापडवून पटलावर ठेवण्यासाठी 2000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार 26 जून 2025 रोजी दाखल करण्यात आली होती.
लाच मागणी पडताळणी दरम्यान चवंडके यांनी फाईल ठेवण्यासाठी 1500 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज नवीन प्रशासकीय इमारत, कॅम्प, पुणे येथे चहाच्या कॅन्टीनजवळ सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष 1500 रुपये स्वीकारताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यांच्याकडून लाच रक्कमेसह 200 रुपये व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घरझडतीसाठी पथक रवाना झाले असून तपास अधिकाऱ्यांकडून आरोपीचा मोबाईल तपासणीसाठी घेतला गेला आहे.
तपास अधिकारी:
प्रवीण निंबाळकर
पोलीस निरीक्षक सर्वदा सावळे, ला.प्र.वि. पुणे
मार्गदर्शन अधिकारी:
श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे
डॉ. शीतल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक
श्री. दयानंद गावडे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. पुणे
सर्व नागरिकांना आवाहन:
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी, किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम शासकीय कामासाठी लाच मागत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याशी 1064 या टोल फ्री क्रमांकावर किंवा dyspacbpune@mahapolice.gov.in या ईमेलवर तात्काळ संपर्क साधावा