लोकदर्शन प्रतिनिधी – 👉मोहन भारती,
गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा 2025 या 21 एप्रिलपासून सुरू असून सर्व परीक्षा केंद्रांवर प्रामाणिकपणे परीक्षा घेतली जात आहे. मात्र, या परीक्षांमध्ये सक्रीय सहभाग असलेल्या प्राध्यापकांनाच विद्यापीठाने पेपर मूल्यांकन केंद्रावर अनुपस्थित राहिल्यामुळे ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्याने संतापाची लाट उसळली आहे.
परीक्षा काळात संबंधित प्राध्यापक मुख्य पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक किंवा बाह्य पर्यवेक्षक म्हणून सकाळी 7.30 ते सायंकाळी 7.00 पर्यंत परीक्षा केंद्रांवर परीक्षांचे कार्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या विषयाच्या पेपर मूल्यांकनासाठी केंद्रावर उपस्थित राहता येत नाही, हे लक्षात न घेता विद्यापीठाने ही नोटीस बजावली आहे.
या पार्श्वभूमीवर गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ. विवेक गोर्लावार यांनी कुलगुरूंना निवेदन देऊन कारणे दाखवा नोटीस तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की, परीक्षा सुरळीत पार पाडणारे पर्यवेक्षकच जर अशा अन्यायकारक नोटीसेच्या कचाट्यात अडकवले जात असतील, तर ते नक्कीच मानसिक त्रासदायक आहे. कोणतीही शहानिशा न करता पाठवलेली नोटीस हा प्राध्यापकांच्या कर्तव्यनिष्ठेचा अपमान आहे.
या घटनेमुळे परीक्षेच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित होत असून, संघटनेने पुढील निर्णयासाठी विद्यापीठ प्रशासनाने त्वरित लक्ष घालण्याची गरज अधोरेखित केली आहे.
—