गडचांदूरमध्ये सांस्कृतिक महिला महोत्सव 2026 उत्साहात; महिलांच्या कलागुणांना नवे व्यासपीठ

लोकदर्शन 👉मोहन भारती

गडचांदूर येथे आमदार देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘सांस्कृतिक महिला महोत्सव – 2026’ मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले की, महिलांमध्ये उपजतच कलागुण आणि कल्पकता असते, मात्र योग्य व्यासपीठाच्या अभावी हे गुण अनेकदा दडपले जातात. सांस्कृतिक महिला महोत्सवाच्या माध्यमातून महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळत आहे. हा महोत्सव महिलांच्या आत्मविश्वासाला बळ देणारे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महोत्सवाचे मुख्य आयोजक आमदार देवराव भोंगळे यांनीही आपल्या मनोगतातून सांगितले की, ग्रामीण भागातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिभा आहे. या महोत्सवामुळे शहरासह ग्रामीण भागातील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.

या महोत्सवात एकल नृत्य, सामूहिक नृत्य तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धांद्वारे महिलांनी आपल्या कला सादर केल्या. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महिलांनी दाखवलेल्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here