लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा, दि. २९ — वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत राजुरा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी तब्बल १ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने २७ मार्च रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीमुळे राजुरा, कोरपना, गोंडपिपरी आणि जिवती या चारही तालुक्यांतील तांडा वस्त्यांमध्ये मूलभूत सोयीसुविधांच्या कामांना गती मिळणार आहे. विशेषतः अंतर्गत रस्ते, सिमेंट काँक्रीट रस्ते, नाल्या तसेच सभागृह बांधकाम यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
या निधीच्या मंजुरीसाठी आमदार देवराव भोंगळे यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. मतदारसंघातील प्रत्येक तांडा वस्तीपर्यंत विकास पोहोचवण्याच्या उद्देशाने त्यांनी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून हा निधी मिळवण्यात यश मिळवले.
या निर्णयामुळे मतदारसंघातील एकूण १४ विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यामुळे तांडा वस्त्यांमधील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शासकीय निर्णयानुसार, राजुरा तालुक्यातील बापूनगर, चंदनवाही आणि भुरकुंडा खुर्द येथे अंतर्गत रस्ते व नाल्यांची कामे होणार आहेत. जिवती तालुक्यातील सेवादासनगर, टाटाकोहाड, पाटागुडा, आनंदगुडा व शंकरपठार येथे सीसी रस्ते, बंदिस्त नाली आणि सभागृह बांधकामाला मंजुरी मिळाली आहे.
तसेच कोरपना तालुक्यातील पिपर्डा आणि धानोली तांडा येथे सिमेंट नाली व रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा, नंदवर्धन, शिवणी देशपांडे आणि धाबा येथेही मूलभूत सुविधांच्या विकासकामांना गती मिळणार आहे.
आमदार भोंगळे यांच्या या प्रयत्नांचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.





