लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर : शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग व अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ‘स्त्रीभ्रूण हत्या’ या विषयावर एक दिवसीय विद्यार्थी परिसंवादाचे आयोजन दि. ९ मार्च २०२६ रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्वात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व आयोजिका म्हणून डॉ. माया मसराम यांनी कार्यभार सांभाळला, तर प्रा. उज्वला जाणवे यांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. अक्षता परसुटकर या विद्यार्थिनींनी केले.
परिसंवादात मनीषा चौधरी, अर्पणा भोयर, प्रभूदास परचाके, चांदणी सोमवलकर आणि पियुष आत्राम या विद्यार्थ्यांनी ‘स्त्रीभ्रूण हत्या’ या विषयावर आपले विचार व मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ. माया मसराम यांनी विद्यार्थ्यांना जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून सांगताना स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी जागरूक होण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच या समस्येसाठी पुरुषांप्रमाणेच काही प्रमाणात महिलाही जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी महिलांना सहकार्य केल्यासच खऱ्या अर्थाने संघटन निर्माण होईल, असे विचार त्यांनी मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शारदा चाटारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जहीर शेख या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या परिसंवादात विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग होता.





