लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या पर्यावरणीय समस्या आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. या संदर्भात लोहारडोंगरी येथील प्रस्तावित लोह खाण प्रकल्प रद्द करावा तसेच मानव-वन्यजीव संघर्षावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने राज्य सरकारकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शहराध्यक्ष संतोष लहामगे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात अंबिका प्रसाद दवे, माजी महापौर संगीता अमृतकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर, माजी अध्यक्ष सुनंदाताई धोबे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चंद्रपूर जिल्हा सध्या गंभीर पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर ५ मार्च २०२६ पासून बंडू धोतरे यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला असून त्यांच्या आंदोलनातील मागण्या पर्यावरण व वन्यजीव संरक्षणाशी संबंधित आहेत.
काँग्रेसने निवेदनात नमूद केले आहे की, ब्रह्मपुरी वनविभागातील लोहारडोंगरी येथे प्रस्तावित लोह खाण प्रकल्प ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या महत्त्वाच्या भ्रमणमार्गात (कॉरिडॉर) येतो. या प्रकल्पामुळे सुमारे १८ हजारांहून अधिक वृक्षतोड होण्याची शक्यता असून त्यामुळे वन्यजीवांचा अधिवास नष्ट होण्याबरोबरच मानव-वन्यजीव संघर्ष आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या खाण प्रकल्पाला देण्यात आलेली वन्यजीव विषयक परवानगी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात जवळपास २०० ग्रामस्थांचा मृत्यू झाला असून २०२५ मध्येच ४७ जणांनी प्राण गमावले. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि आदिवासी नागरिक सतत भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या ११ सदस्यीय तांत्रिक समितीच्या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करून मानव-वन्यजीव संघर्षावर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय चंद्रपूर शहर व जिल्हा वाढत्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रस्तावित खाण प्रकल्पांमुळे हवा व पाण्याचे प्रदूषण वाढण्याची शक्यता व्यक्त करत व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित ठेवणे, जंगलांचे विखंडन थांबवणे आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी शासनाने ठोस धोरण राबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनाच्या शेवटी चंद्रपूरची समृद्ध वनसंपदा आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी वैयक्तिक लक्ष घालून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच उपोषणकर्ते बंडू धोतरे यांचे आरोग्य खालावत असल्याने त्यांच्या आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घेऊन लवकर तोडगा काढावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
मुख्य मागण्या :
लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्प तात्काळ रद्द करावा.
चंद्रपूर जिल्ह्याला ‘व्याघ्र जिल्हा’ घोषित करून मानव-वन्यजीव संघर्षासाठी विशेष आपत्कालीन आराखडा राबवावा.
व्याघ्र भ्रमणमार्गांवर प्रस्तावित ओव्हरपास व अंडरपासची कामे तातडीने सुरू करावीत.
रेस्क्यू सेंटर व टायगर सफारी प्रकल्पाला गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.
बंडू धोतरे यांच्या प्रलंबित १७ मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.





