लोकदर्शन चंद्रपूर : 👉मोहन भारती
चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या मानव–वन्यप्राणी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष तथा पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देत धोतरे यांच्या मागण्या न्याय्य असल्याचे सांगत प्रशासनाने या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष लहामगे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, ज्येष्ठ काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, अंबिका प्रसाद दवे, रामकृष्ण कोडरा, तिवारीजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोतरे यांनी दि. ५ मार्च २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर समोर अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे. या आंदोलनातून मानव–वन्यप्राणी संघर्षावर ठोस उपाययोजना करणे, ताडोबा परिसरातील महत्त्वाच्या कॉरिडोरमध्ये प्रस्तावित लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पास वन्यजीव विषयक परवानगी नाकारावी, व्याघ्र जिल्हा संकल्पना प्रभावी करणे, चंद्रपूर–मुल मार्गाची सुधारणा, वनरक्षकांना मदतनीस उपलब्ध करून देणे, पीआरटी (प्रॉब्लेम रिस्पॉन्स टीम) ला मानधन देणे तसेच बिबट समस्यामुक्त ग्राम योजना प्रभावीपणे राबविणे यांसह एकूण १६ मागण्या करण्यात आल्या आहेत.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी सांगितले की, मानव–वन्यप्राणी संघर्षामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या गंभीर समस्येकडे प्रशासनाने केवळ औपचारिकतेने न पाहता ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. बंडू धोतरे यांनी मांडलेल्या मागण्या पूर्णपणे न्याय्य असून काँग्रेस पक्ष त्यांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा देत आहे.
याच पार्श्वभूमीवर दि. ९ मार्च रोजी दुपारी सर्वपक्षीय व सर्वसमावेशक शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आंदोलनातील मागण्या व जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या बैठकीसाठी सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी, पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान ताडोबा परिसरातील अत्यंत संवेदनशील वन्यजीव कॉरिडोरमध्ये प्रस्तावित लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पास वन्यजीव विषयक परवानगी देण्याच्या निर्णयाला पर्यावरणवादी संस्थांकडून तीव्र विरोध होत असून या विषयासह आंदोलनातील १६ मागण्यांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे धोटे यांनी स्पष्ट केले.
मागण्यांकडे प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोनातून लक्ष न दिल्यास जिल्ह्यात मोठा जनक्षोभ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे मानव–वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासन व प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.





