लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर (ता.7मार्च 2026:
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत नागरिकांच्या विविध महसूल विषयक समस्या सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता स्व. भाऊसाहेब चटप आश्रम शाळा, गडचांदूर (ता. कोरपना, जि. चंद्रपूर) येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालय, कोरपना यांच्या वतीने देण्यात आली आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसूल सेवा व शासनाच्या योजनांबाबत थेट मार्गदर्शन व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ मधील दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८-अ उतारे, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र तसेच नॉन-क्रीमिलिअर प्रमाणपत्र यांसारख्या सेवांचा समावेश आहे.
तसेच अकृषिक (NA) परवानगी प्रक्रियेची माहिती, संजय गांधी सामाजिक सुरक्षा योजना, विद्यार्थी दाखले, बुकदेवी प्रकरणे, पाणंद रस्ता बाबत आदेश, घरपट्टी व ई-नोंदणी, अनुदानित व पीक विमा नोंदणी तसेच वृक्षलागवड नोंदणी यांसारख्या विविध शासकीय सेवाही या शिबिरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज न पडता त्यांच्या समस्या त्वरित सोडविण्यास मदत होणार आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालय, कोरपना यांच्या वतीने करण्यात आले आहे.





