लोकदर्शन चंद्रपूर.👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर : ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी ठामपणे लढा देणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची पुन्हा एकदा इतर मागासवर्गीयांच्या कल्याण विषयक संसदीय समितीवर (२०२५-२६) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला.
२९ ऑगस्ट २०२५ रोजी ‘समाचार भाग-दोन’ द्वारे जाहीर झालेल्या या समितीच्या अध्यक्षपदी खासदार गणेश सिंह यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत लोकसभा व राज्यसभेतील निवडक सदस्यांचा समावेश असून, तिचे कार्य ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे मानले जाते.
धानोरकर यांना दुसऱ्यांदा ही जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या मागील कार्याची दखल घेतल्याचे स्पष्ट होते. याआधीही त्यांनी संसदेत ओबीसी समाजाशी संबंधित जातनिहाय जनगणना, शैक्षणिक व रोजगार संधी यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सातत्याने आवाज उठवला आहे.
ओबीसी समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या या पुनर्नियुक्तीमुळे समितीतून पुन्हा एकदा बुलंद आवाज उमटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.