लोकदर्शन नवी दिल्ली :👉मोहन भारती
राज्याचे माजी मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध रस्ते व उड्डाणपुलांच्या कामांच्या मागण्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.
यावेळी आ. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची सद्यस्थिती, राष्ट्रीय महामार्गावरील समस्या आणि उड्डाणपुलांच्या गरजांविषयी सविस्तर निवेदन सादर केले. त्यावर तत्परतेने प्रतिसाद देत ना. गडकरी यांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
चंद्रपूर–मूल राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रीट करण्याची मागणी, मुल शहरासाठी प्रस्तावित 6.14 किमी लांबीच्या बायपास रस्त्यावर रोड ओव्हर ब्रिज बांधणी, तसेच एन.एच. 930 वरील रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल उभारणी यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी विशेष पाठपुरावा केला.
याशिवाय, जानाला, आगडी, गोंडसावरी, महादवाडी, अजयपूर, चिचपल्ली, वलनी, घंटाचौकी आणि लोहारा या गावांच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाजवळील जुन्या व अरुंद नाल्यांमुळे होत असलेल्या पाण्याच्या निचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून अंदाजे 8 किमी लांबीच्या आरसीसी काँक्रीट नाल्यांची मागणीही त्यांनी केली.
तसेच बल्लारपूर, मुल आणि पोंभुर्णा तालुक्यांतील विविध विकासकामांना केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
या भेटीत दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या रस्ते व वाहतूक सुविधांचा विकास वेगाने होईल, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.