लोकदर्शन जिवती👉प्रा. गजाजनन राऊत
जिवती (प्रतिनिधी) – विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, जिवती येथील राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग तसेच महिला सक्षमीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह व राष्ट्रीय क्रीडा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमांमध्ये आरोग्य, संस्कृती, स्वदेशी आणि स्त्रीशक्ती या विषयांवर विशेष भर देण्यात आला. सप्ताहाची सुरुवात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून देत मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचा संदेश देऊन करण्यात आली. तसेच युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने स्वदेशी उद्योग, हस्तकला व स्थानिक उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऑपरेशन सिंदूर या अभियानाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी महिलांचे शिक्षण, सुरक्षितता आणि आत्मनिर्भरता यावर व्याख्यानांचे आयोजन झाले.
सप्ताहाचा समारोप हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनादिवशी आरोग्य शिबिराने झाला. या शिबिरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, स्वच्छतेचे मार्गदर्शन व रोगप्रतिबंधक उपाय सांगण्यात आले. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोफत तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. शाक्य मॅडम यांनी भूषविले. त्यांनी आपल्या भाषणात आरोग्य संवर्धन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशीचा अंगीकार व स्त्रीशक्तीचा गौरव हीच खरी राष्ट्रीय सेवा आहे, असे प्रतिपादन केले.
मुख्य मार्गदर्शक डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी आत्मनिर्भर भारत आणि ऑपरेशन सिंदूर यावर सविस्तर भाष्य केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव साहेब यांनी सुदृढ आरोग्य आणि त्याची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. गजानन राऊत, प्रा. संजय देशमुख, डॉ. परवेज अली व प्रा. गणेश कदम मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन यनगंदलवार, संचालन प्रा. राहुल सदूलवार, तर आभार प्रदर्शन डॉ. वैशाली डोर्लीकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.