स्मार्ट ग्राम बिबीमध्ये जलजीवन मिशनची ढिसाळ अंमलबजावणी ♦️दर्जेदार कामकाजासाठी जिल्हा परिषदेकडे उपसरपंच आशिष देरकर यांची मागणी

लोकदर्शन 👉मोहन भारती

कोरपना : स्मार्ट ग्राम बिबी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाच्या दर्जेदार अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे यांना उपसरपंच तसेच सरपंच परिषद मुंबईचे जिल्हा समन्वयक आशिष देरकर यांनी प्रत्यक्ष भेटून तक्रार नोंदवली.

गावकऱ्यांच्या कष्टाने उभारलेल्या स्मार्ट व आदर्श गावातील अंतर्गत रस्त्यांची स्थिती जलजीवन मिशनच्या कामामुळे बिकट झाली आहे. हे रस्ते तातडीने दुरुस्त करून देण्याची मागणी करण्यात आली. तब्बल अडीच वर्षांपासून सुरू असलेले हे काम अद्याप ५० टक्क्यांवरच थांबले आहे. कंत्राटदाराच्या चुकीच्या कामकाजामुळे गावातील ड्रेनेज सिस्टमचे मोठे नुकसान झाले असून ते त्वरित सुधारावे, अशी आग्रही भूमिका ग्रामपंचायतीने घेतली. तसेच पाईपलाईनचे काम दर्जेदार आणि तांत्रिक निकषांनुसार व्हावे, यावरही ठाम भर देण्यात आला.

यावेळी उपसरपंच आशिष देरकर यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, जर तातडीने दुरुस्ती व सुधारणा करण्यात आल्या नाहीत, तर ग्रामपंचायत स्तरावरून आमरण उपोषण सुरू केले जाईल.

दरम्यान, शासनाने एकाच वेळी सर्व गावांमध्ये जलजीवन मिशनची अंमलबजावणी सुरू केल्याने विभागाकडे निधीची टंचाई निर्माण झाली आहे. कंत्राटदारांचे प्रलंबित देयक थकलेले असल्यामुळे कामकाजात ढिसाळपणा दिसून येत असल्याचे आरोपही करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या अनियोजित धोरणांमुळे ग्रामीण जीवन संकटात सापडले असून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ग्रामीण जनता सहन करत असल्याचे उपसरपंच देरकर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here