लोकदर्शन देवगड👉 (गुरुनाथ तिरपणकर)
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला जनजागृती सेवा संस्थेतर्फे जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, गवाणे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ मधुसूदन तिरपणकर, संस्थेचे मार्गदर्शक व राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त माजी आय.पी.एस. अधिकारी दिलीप शाहू नारकर, तसेच प्रख्यात चित्रकार अक्षय मेस्त्री यांच्या उपस्थितीत शाळेतील मुख्याध्यापिका अमरीन जावेद शेख, शिक्षक लक्ष्मण भागा घोटकर, सद्गुरू ज्ञानेश्वर तळेकर, बालवाटीका सेविका कुमुदिनी कमलाकर अधिकारी देसाई आणि मदतनीस विजया चव्हाण यांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना श्री. गुरुनाथ तिरपणकर यांनी शिक्षक हेच चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवून देशासाठी आदर्श नागरिक निर्माण करण्याचे कार्य करतात असे गौरवोद्गार काढले. तर श्री. दिलीप नारकर यांनी स्वतःच्या शालेय जीवनातील अनुभव सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. “मी वर्गातील सर्वांत जास्त मार खाल्लेला विद्यार्थी होतो, पण त्या शिक्षेमुळेच मी आय.पी.एस. अधिकारी झालो,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, अभ्यास व संस्कार अंगीकारण्याचे आवाहन केले.
श्री. नारकर यांनी गवाणे शाळेच्या शिक्षकांचे कौतुक करत, “येथील शिक्षक कष्टाळू व उपक्रमशील असून त्यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत,” असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सद्गुरू तळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका अमरीन शेख यांनी मानले. या सोहळ्यात शिक्षकांसह गावकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.