लोकदर्शन 👉मोहन भारती
कोरपना (ता.प्र) : जिल्हा स्मार्ट ग्राम, बिबी यांच्या वतीने “माझी वसुंधरा अभियान” या संकल्पनेवर आधारित तान्हा पोळा स्पर्धेचे आयोजन उत्साहात पार पडले. या स्पर्धेला बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत एकूण 56 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेत कृतिका बोबडे हिने प्रथम पारितोषिक, भाविक थेरे याने द्वितीय, साई टोंगे याने तृतीय तर हर्षिता घुगुल हिने चतुर्थ पारितोषिक पटकाविले. उर्वरित सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालकांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला माजी सभापती साईनाथ कुळमेथे, सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच आशिष देरकर, पोलिस पाटील राहुल आसुटकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष स्वप्नील झुरमुरे, ग्रामपंचायत सदस्या भारती पिंपळकर यांच्यासह विविध मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण मटाले सर, राजू पिंपळकर, अखिल अतकारे व मनीषा धुर्वे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विठ्ठल टोंगे यांनी केले.