🙏
लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे
उरण दि. २२ (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र शासनाने किमान वेतन सल्लागार समिती जाहीर केली असून, या समितीवर कामगार प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब तुकाराम भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या २७ वर्षांपासून बाळासाहेब भुजबळ हे भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून शिरवळ, शिरूर, मावळ, रायगडसह विविध औद्योगिक परिसरात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. अनेक कंपन्यांमधील कामगार वेतनवाढ करार, अन्यायाविरोधातील आंदोलने, तसेच पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे, विविध हॉस्पिटल्स, महाविद्यालये व शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी चळवळी उभारल्या आहेत.
सध्या ते असंघटित क्षेत्रातील हंगामी फवारणी कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तसेच भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे संघटन मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
शासनाच्या किमान वेतन सल्लागार समितीवरून ते विविध उद्योगांतील कायम, कंत्राटी व रोजंदारी कामगारांचे वेतन निश्चित करण्याचे काम करणार आहेत. विशेषतः वीज उद्योग व मेट्रो प्रकल्पातील कामगारांसाठी स्वतंत्र वेतनश्रेणी मिळवून देण्यावर ते भर देतील. “शोषित, पीडित व वंचित कामगारांना सन्मानजनक जीवन जगण्यासाठी योग्य किमान वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार,” असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, पुणे भारतीय मजदूर संघ अध्यक्ष अर्जुन चव्हाण व सचिव सागर पवार यांनी अभिनंदन केले. “किमान वेतनच नाही तर जीवन वेतन मिळावे, अशी अपेक्षा आहे,” असे अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी स्पष्ट केले.
शासनाने व भारतीय मजदूर संघाने दिलेल्या या संधीबद्दल भुजबळ यांनी आभार व्यक्त केले.