लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे
उरण, दि. १५ (विठ्ठल ममताबादे) — उरण शहरातील नागरी सुविधा आणि सोयी-सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या पुढाकार शेकाप शहर चिटणीस शेखर पाटील यांनी घेतला.
१५ ऑगस्ट रोजी शेकापचे शिष्टमंडळ तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष नाहीदा ठाकूर, माजी नगरसेविका लता पाटील, नयना पाटील, दीपा कोळी, नारायण पाटील, गजानन भोईर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनातील प्रमुख मुद्दे:
वाहतूक कोंडी: आनंद नगर ते राजपाल नाका, कोट नाका ते विवेकानंद चौक या मार्गांवर सतत वाहतूक कोंडी; पाच मिनिटांचा प्रवास अर्धा ते एक तास लागतो.
नवीन रस्त्यांची गरज: नवीन शेवा गावाकडून रेल्वे स्टेशनकडे पर्यायी मार्ग, तसेच कोटा नाका बायपासचे काम तातडीने पूर्ण करणे.
रविवारचा बाजार व पिरवाडी बीच वाहतूक: चार फाटा आणि आनंद नगर परिसरात ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी योग्य नियोजन.
पाणी समस्या: वाढती लोकसंख्या पाहता एमआयडीसीकडून पाणीपुरवठ्याचा दाब वाढवणे.
बांधकामांमुळे निर्माण समस्या: रस्त्यावर बांधकाम साहित्य, तुंबलेली गटारे, आवाज प्रदूषण.
अग्निशमन केंद्र: शहरात स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारणे.
कचरा व्यवस्थापन व मच्छरनियंत्रण: वेळेवर कचरा उचलणे आणि नियमित कीटकनाशक फवारणी.
वाचनालय: माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयाचे अपुर्या जागेतून सुसज्ज जागेत स्थलांतर.
फेरीवाला झोन: हातगाड्या व फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करणे.
सुलभ शौचालय: नवीन शौचालये उभारणे व विद्यमान शौचालयात स्वच्छता राखणे.
तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी सर्व मुद्दे लक्षपूर्वक ऐकून घेऊन, संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.