लोकदर्शन चंद्रपूर👉 प्रा. गजाजन राऊत
चंद्रपूर :14ऑगस्ट
पंचवीस वर्षांनंतर आयुष्याच्या धकाधकीत हरवलेली आणि संघर्षाच्या वळणावर दुरावलेली मैत्री पुन्हा एकत्र आली, तेव्हा जुने दिवस अक्षरशः डोळ्यांसमोर उभे राहिले. सरदार पटेल कॉलेज, चंद्रपूर येथील एम.ए. मराठी लिटरेचर 1999 बॅचच्या विद्यार्थ्यांनी 10 ऑगस्ट रोजी महाराणा रिसॉर्ट येथे रौप्यमहोत्सवी मैत्री मिलन सोहळा जल्लोषात साजरा केला.
दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. “अरे तू… कुठे होतास?” अशा हक्काच्या हाका, हास्यविनोद, टिंगलटवाळ्या आणि कॉलेजच्या दिवसांची रंगत या सगळ्यांनी वातावरण भारून गेले. कॅन्टीनवरील समोसे-भजी, चहाचे घोट आणि अनगिनत गप्पा – या सगळ्यांनी पुन्हा 25 वर्षे मागे नेऊन ठेवले.
मैत्रीचा धागा अधिक मजबूत
जीवनात डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक, पोलीस अशा विविध क्षेत्रात स्थिरावलेले हे मित्र-मैत्रिणी त्या दिवशी केवळ ‘मित्र’ म्हणून एकत्र आले. नातेसंबंध, सामाजिक प्रतिष्ठा आणि पदव्या बाजूला ठेवून सरळ मनाने एकमेकांशी संवाद साधला. मैत्रीतील निखळ भावनांनी मनाला हलके केले.
भेटीचा संकल्प
वेळ कमी पडला, काही गोष्टी न बोलताच राहिल्या; पण सर्वांनी यापुढेही अशाच भेटी घेत राहण्याचा आणि मैत्रीचा बंध अधिक घट्ट करण्याचा संकल्प केला.
या मिलन सोहळ्यात डॉ. गजानन राऊत, डॉ. माधवी बुटले, डॉ. शीतल निमगडे, जया येतेकर, भारती माणूसमारे, टीव्ही जर्नालिस्ट सुनील ढगे, पत्रकार राजेश भोजेकर, मनोज सोनकर, विनय दडमल, वैशाली झाडे, साधना शेंडे, कल्पना गिरडकर, सुवर्णा बुरडकर, वनिता कुत्तरमारे, कमलेश श्रीरामे, विनोद वदनलवार यांसह अनेक मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.