लोकदर्शन धाराशिव 👉 राहुल खरात
धाराशिव, दि. 12 (प्रतिनिधी) – साहित्याचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे, सामाजिक जाणिवा मनात रुजवून लेखणी चालवणारे आणि मराठी साहित्यातील आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे प्रा. राजा जगताप यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. शुभांगी ताई काळभोर (पुणे) यांनी नियुक्तीपत्र देऊन ही निवड जाहीर केली. मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष तु.दा. गंगावणे यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
टाकळी (बे.), ता. जि. धाराशिव येथील रहिवासी असलेले प्रा. जगताप सध्या धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कथाकार, कादंबरीकार व समीक्षक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या साहित्यकृतींमध्ये “आभाळ” (कथासंग्रह), “गाव तेथे बुद्ध विहार” (कादंबरी), “तिचे पत्र” (ललित लेख संग्रह), “आंबेडकरी साहित्य समीक्षा” (समीक्षात्मक ग्रंथ) यांचा समावेश आहे. लवकरच त्यांचा “वाळू आणि माती” हा कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
प्रा. जगताप यांचे लेखन नियमितपणे विविध वर्तमानपत्रांतून प्रकाशित होत असून, त्यांच्या लेखणीतील सामाजिक भान, प्रगल्भ विचार आणि साहित्यनिष्ठा लक्षात घेऊनच ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
निवडीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना प्रा. जगताप म्हणाले –
> “धाराशिव जिल्ह्यात वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी आणि साहित्यिक चळवळींना चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.”
प्रा. राजा जगताप यांच्या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यातील साहित्यप्रेमींमध्ये आनंदाची लहर उसळली आहे.