आदिवासी समाज सात्विकता, पराक्रम व परिश्रमाचे प्रतीक – आ. सुधीर मुनगंटीवार ♦️जागतिक आदिवासी दिनानिमित्त पोंभूर्णा येथे भव्य सोहळा; ♦️समाजाच्या विकास, हक्क व सशक्तीकरणासाठी कटिबद्धतेचा पुनरुच्चार

लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती

चंद्रपूर – “आदिवासी समाज हा सात्विक जीवनशैली, पराक्रम आणि अथक परिश्रमाचा जिवंत आदर्श आहे. निसर्गाशी एकरूप होऊन परंपरा, संस्कार आणि निष्ठा जपणारा हा समाज देशाच्या विकास प्रवासात मोलाचे योगदान देतो,” असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ते पोंभूर्णा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाला गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे जिल्हाप्रमुख जगन येलके, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, सचिव हरी कोडापे, महिला अध्यक्षा उषाताई आलाम, महादेव मडावी, कवडू मडावी, कांता मडावी, गीताताई कुळमेथे, गीताताई कोवे, भीमराव मरसकोल्हे, सामाजिक कार्यकर्ता गणेश परचाके यांच्यासह समाजातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. मुनगंटीवार यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना सांगितले की, “आपल्या विद्यार्थ्यांनी एवरेस्ट शिखर सर केले, ही जन्मजात ताकद आहे. योग्य संधी मिळाल्यास हेच विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवू शकतात.” त्यांनी कल्याणकारी योजना प्रभावीपणे प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवून जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कष्टकरी आणि पराक्रमी आदिवासी समाजाच्या कल्याण, विकास आणि हक्कांच्या रक्षणासाठी सदैव खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत आ. मुनगंटीवार यांनी आदिवासी भगिनींनी राखी बांधून साजऱ्या केलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात सहभागी होत आपुलकीचा मान स्वीकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here