लोकदर्शन :👉मोहन भारती
‘नाते आपुलकीचे’ ही संस्था गेल्या पाच वर्षांपासून अनाथ, अपंग, अपघातग्रस्त व आजारग्रस्त गरजवंतांना निरपेक्षपणे मदत करत समाजमनात आपले स्थान निर्माण करत आहे. ३५० सदस्यांच्या सामूहिक सहकार्याने आणि पारदर्शक कारभाराने या संस्थेने अनेक निराश्रितांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले आहे.
याच सामाजिक बांधिलकीतून गडचांदूर येथील सुमित ठाकरे या आठवीत शिकणाऱ्या मुलाला दुर्धर आजाराशी झुंज देण्यासाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी सुमितला गंभीर आजार झाल्याने त्याच्या उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज होती. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली असल्याने त्याचे वडील शर्थीचे प्रयत्न करत असले तरी मोठा खर्च करणे कठीण होत होते.
अशा वेळी संस्थेचे सदस्य राजेश कांबडे यांनी सुमितच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली. सर्व सदस्यांच्या एकमताने संस्थेतर्फे तातडीची १० हजार रुपयांची मदत देण्यात आली.
मदत प्रदान समारंभावेळी ‘नाते आपुलकीचे’ संस्थेचे सल्लागार उमेश पारखी, सदस्य तुळशीराम पानघाटे, बंडूभाऊ वैरागडे, विवेकभाऊ येरणे, राजेशजी कांबडे तसेच सुमितचे आई-वडील उपस्थित होते.
संस्थेने पुन्हा एकदा दाखवून दिले की गरजूंना वेळेवर आधार देणे आणि समाजाभिमुख कार्य करणे हीच खरी सेवा होय.