लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे
उरण, दि. ५ (विठ्ठल ममताबादे) — काँग्रेस पक्षातील एकनिष्ठ, प्रामाणिक आणि लढाऊ कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या, दिवंगत काँग्रेस नेते शाम म्हात्रे यांची कन्या श्रुती शाम म्हात्रे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षासाठी दिलेल्या त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत वरिष्ठ पक्षनेत्यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
श्रुती म्हात्रे यांनी आतापर्यंत महिला काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीवर काम करताना गोर-गरिबांसाठी, अन्यायाविरोधात आणि समाजहितासाठी लढा दिला आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल आणि काँग्रेसची ध्येये-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहील, असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला.
पदग्रहणानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, समन्वयक गणेश पाटील, ज्येष्ठ नेते आर. सी. भाई घरत यांसह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आभार मानले. त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तसेच इतर वरिष्ठ नेत्यांचेही विशेष आभार मानले.
श्रुती म्हात्रे यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की —
“पक्षात काम करताना जिल्हा किंवा राज्य या सीमारेषा महत्त्वाच्या नसतात; आपण काँग्रेससाठी काम करतो याचा अभिमान असतो. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून पुन्हा त्याच पदावर काम करण्याची संधी मिळाल्याचा मला अधिक आनंद आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत नेण्याचा प्रयत्न करेन.”
गोर-गरिबांच्या प्रश्नांवरील त्यांची जाण, लढाऊ बाणा, उत्तम संघटनकौशल्य, प्रभावी वक्तृत्व आणि सर्व राजकीय स्तरांशी असलेले स्नेहसंबंध या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. हा वारसा आणि कौशल्य त्यांनी आपल्या वडिलांकडून आत्मसात केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी त्यांचा अनुभव आणि नेतृत्व मोठे योगदान देणार आहे, असा विश्वास व्यक्त होत आहे.