महसूल सप्ताह 2025 ची कोरपना तालुक्यात उत्साहात सुरुवात – आमदार देवराव भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती ♦️महसूल विभागाच्या सेवांचा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार; सप्ताहभर विविध उपक्रमांचे आयोजन

लोकदर्शन गडचांदूर (प्रतिनिधी: अशोककुमार भगत) –

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या निर्देशानुसार, दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून राज्यभर सुरू झालेला “महसूल सप्ताह 2025” कोरपना तालुक्यात उत्साहात साजरा होत आहे. सप्ताहाचा शुभारंभ 1 ऑगस्ट रोजी “महसूल दिन” म्हणून करण्यात आला असून, यानिमित्ताने राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत विविध उपक्रम राबवले जात आहेत.

या सप्ताहात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल प्रशासन, जमीन अभिलेख, नगर परिषद, ग्रामपंचायती, आणि विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत महसूल विभागाच्या योजनांचा लाभ पोहचवला जाणार आहे.

तहसीलदार कोरपना यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्ताहाच्या पहिल्या दिवशी शासकीय व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 2 ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालयात अतिक्रमण प्रकरणांचा आढावा, पात्र कुटुंबांना पट्टेवाटप आदी विषयांवर बैठक घेण्यात आली.

3 ऑगस्ट रोजी नारंडा मंडळातील भारोसा गावात पांदन रस्त्याचे उद्घाटन व वृक्षारोपण कार्यक्रम आमदार भोंगळे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 4 ऑगस्टला “छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान” अंतर्गत विविध दाखले व योजना गावातच देण्याची मोहिम राबवली जाईल. 5 ऑगस्ट रोजी DBT पोर्टलवरील आधार न पडलेल्या लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेंतर्गत अनुदान वाटप होईल.

6 ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही केली जाईल. 7 ऑगस्ट रोजी “M-Sand” धोरणाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे.

“महसूल विभागाच्या योजना व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्वांनी या सप्ताहात सहभागी व्हावे,” असे आवाहन तहसीलदार कोरपना यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here