मानवतेचा धर्म टिकवणाऱ्या कार्याचा सन्मान — सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा रत्नलाम येथे गौरव ♦️फुले दाम्पत्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या सत्यशोधक विधीकर्त्याचा अखिल भारतीय माळी महासंघाकडून सत्कार

✍️ रत्नलाम (म.प्र.) / पुणे | वार्ताहर – लोकदर्शन प्रतिनिधी

अखिल भारतीय माळी महासंघाचा २४ वा वर्धापन दिन व सत्कार समारंभ १९ जुलै २०२५ रोजी मध्यप्रदेशातील रत्नलाम येथील जानकी हॉलमध्ये उत्साहात पार पडला. या सोहळ्यात सत्यशोधक विधीकर्ते रघुनाथ ढोक यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

पुणे-सातारा येथील रहिवासी असलेले रघुनाथ ढोक हे महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले चरित्र साधना साहित्य व प्रकाशन समितीचे सदस्य आहेत. तसेच “फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन”चे अध्यक्ष म्हणून त्यांनी सत्यशोधक विचार आणि विधी कार्याची चळवळ महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये प्रभावीपणे पुढे नेली आहे. या सामाजिक कार्यासाठी त्यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि भव्य हार घालून गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. विलास पाटील, कार्याध्यक्ष माजी न्यायाधीश शिवदास महाजन, मध्यप्रदेश अध्यक्ष वकील किशोर वाघेला, जिल्हाध्यक्ष डॉ. चंचल चौहान, शहराध्यक्ष नारायण स्वामी, सुरत अध्यक्ष डॉ. शामराव फुले, तेलंगणा अध्यक्ष प्रा. सुकुमार पेटकुले, लेखक राजेंद्र महाडोळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मनोगतात सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले, “महात्मा फुले यांच्या कर्मभूमीतून आलो असून, गेल्या पाच वर्षांत ५३ सत्यशोधक विवाह, १४ गृहप्रवेश व अनेक सामाजिक विधी पार पाडले. फुले दाम्पत्यांनी समाजाला शिक्षणाची गंगा पोहोचवली, म्हणूनच आज मानवता धर्म टिकून आहे.”

कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित कवी दवणे यांची प्रेरणादायी कविता सादर झाली. अध्यक्षीय भाषणात फुले दाम्पत्यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली. तसेच ३ जानेवारीला ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून मध्यप्रदेशात आणि केंद्रस्तरावर घोषित करण्याचे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी विविध राज्यांतील प्रतिनिधींचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चंचल चौहान यांनी केले तर आभारप्रदर्शन स्वामी नारायण यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर
(वार्ताहर – लोकदर्शन प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here