लोकदर्शन मुंबई 👉 – गुरुनाथ तिरपणकर
मुंबई : साप्ताहिक “आम्ही मुंबईकर” आयोजित “सांस्कृतिक व साहित्य रत्न पुरस्कार २०२५” हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, २७ जुलै रोजी जोगेश्वरी (पूर्व) येथील जुनी अस्मिता शाळा, श्रीकृष्ण नगर, पिपळेश्वर मंदिर गल्ली, बांदेकर वाडी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत उत्साहात संपन्न होणार आहे.
साप्ताहिक “आम्ही मुंबईकर” हे महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात वाचले जाणारे लोकप्रिय साप्ताहिक असून, विविध क्षेत्रातील पत्रकार, लेखक, कवी, चारोळीकार, साहित्यिक इत्यादींना यामधून लिहिण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळते. या साप्ताहिकाचे मुख्य संपादक श्री. प्रमोद सुर्यवंशी व उप संपादिका सौ. वसुधा नाईक यांच्या पुढाकाराने साहित्य व संस्कृती क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींना गौरविण्यासाठी हा पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांना निवडपत्र पाठविण्यात आले असून कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता सन्मान करण्यात येत आहे. यासाठी पुरस्कारार्थींनी आयोजकांचे विशेष आभार मानले आहेत.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पाठ्यपुस्तकातील सुप्रसिद्ध कवी श्रीराम घडे, ज्येष्ठ साहित्यिक व अभिनेते अजय बिरारी, ज्येष्ठ साहित्यिका व समाजसेविका सौ. वनिता कदम, उप संपादिका सौ. वसुधा नाईक, तसेच फिल्म इंडस्ट्रीमधील प्रोडक्शन मॅनेजर व कास्टिंग तज्ज्ञ सागर पतंगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी ग्राफिक्स डिझायनर अंगद दराडे, संपादकीय व तांत्रिक टीम, तसेच साप्ताहिक “आम्ही मुंबईकर” परिवाराकडून विशेष परिश्रम घेण्यात आले असून, सर्व पुरस्कारार्थींचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
सर्व पुरस्कारार्थींनी आणि उपस्थित मान्यवरांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संपादक प्रमोद सुर्यवंशी व उप संपादिका सौ. वसुधा नाईक यांनी केले आहे.