चंद्रपूरच्या शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक उडी : गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्र व तंत्रनिकेतन महाविद्यालयास मंजुरी ♦️आ. मुनगंटीवार यांच्या दीर्घदीर्घाकालीन प्रयत्नना अखेर यश

| लोकदर्शन सकारात्मक लोकजागर 👉मोहन भारती

मुंबई / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले असून, गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्रासाठी ४१४ कोटींच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी, तसेच मुल शहरात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. या दोन्ही निर्णयांना चालना मिळण्यामागे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि दूरदृष्टी आहे.

राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत काम करताना शिक्षण क्षेत्रालाही विशेष प्राधान्य दिले आहे. त्याच प्रयत्नांमुळे उच्च शिक्षणाच्या नव्या संधी आता जिल्ह्यातील युवकांना मिळणार आहेत.

मुंबईतील सुवर्णगड शासकीय निवासस्थानी नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. गोंडवाना विद्यापीठाचे पदाधिकारी, उच्च शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपूर येथे स्थापन करण्यासाठी ४१४ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देत तो उच्चस्तरीय समितीकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्याचे निर्देश दिले.

त्याचप्रमाणे मुल शहरात नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय स्थापनेसाठीदेखील सकारात्मक निर्णय घेण्यात आला. या दोन्ही निर्णयांमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व रोजगाराभिमुख शिक्षणाची दारे खुली होणार आहेत.

आ. मुनगंटीवार यांच्या दीर्घकालीन प्रयत्नांना अखेर यश आले असून, विदर्भातील युवकांना भविष्य घडवण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू होणार असून, नागरीकांत समाधानाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here