चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या दुरवस्थेवर खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आक्रमक इशारा: तात्काळ दुरुस्ती करा, अन्यथा टोलवसुली थांबवा!

लोकदर्शन चंद्रपूर👉शिवाजी सेलोकर

चंद्रपूर-नागपूर महामार्गाची अत्यंत खराब अवस्था आणि सुरू असलेली टोलवसुली याविरोधात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहून त्यांनी या समस्येकडे लक्ष वेधले असून, महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याची आणि तो सुस्थितीत येईपर्यंत टोलवसुली थांबवण्याची मागणी केली आहे.

खासदार धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, पावसाळ्यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या दुरवस्थेमुळे अपघात आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महामार्ग बीओटी तत्त्वावर बांधण्यात आला असून, चांगल्या प्रतीच्या रस्त्यासाठी टोल आकारला जातो. मात्र, सध्याच्या अवस्थेत खराब रस्त्यावर टोलवसुली सुरू ठेवणे चुकीचे असल्याचे खासदार धानोरकर यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर, त्यांनी अधीक्षक अभियंत्यांना विनंती केली आहे की, महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी आणि जोपर्यंत रस्ता सुस्थितीत येत नाही, तोपर्यंत टोलवसुली थांबवावी. या पत्राची प्रत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १, चंद्रपूर आणि प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण, चंद्रपूर यांनाही पाठवण्यात आली आहे.

खासदार धानोरकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे आणि महामार्गावरील प्रवास सुरक्षित व सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here