लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर, २७ जून – प्रहार संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर गडचांदूर नगरपरिषदेकडून दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या 5% विशेष निधीच्या वितरणास प्रारंभ झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला हा निधी तत्काळ वाटप करण्यासाठी प्रहार संघटनेने दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन मुख्याधिकारी चव्हाण यांच्याशी थेट चर्चा केली.
नगरपरिषदेच्या वार्षिक उत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर होण्यासाठी प्रहारने दिलेलं निवेदन आणि ठाम मागणी यामुळे सकारात्मक तोडगा निघाला. या निधीचा वापर दिव्यांग बांधवांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी होणार असून, अनेक गरजा पूर्ण होण्यास मदत होणार आहे.0
या उपक्रमाला राजुरा विधानसभा मतदारसंघाचे *आमदार देवराव भोंगळे*, *नगरपरिषद मुख्याधिकारी चव्हाण,* *प्रहारचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर* कोरपना तालुका प्रमुख विनोद शिंदे, तसेच कार्यकर्ते सतिश शेरे, प्रफुल देवलकर, अनुप राखुंडे, दिनेश राठोड, महादेव बेरड, निलेश मुरमुरबार, नितीन सपकाळ, सूरज बार, सरोज मडावी, वाजीद, अमित कनोजिया, राकेश शेंद्रे, पवन येणगुंटीवार आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमात संविधान भेट देण्यात आले आणि DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे सर्व पात्र दिव्यांग बांधवांच्या खात्यात निधी जमा करण्यात आला. यावेळी प्रहारचे सतीश बिडकर यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे गडचांदूर येथे ‘दिव्यांग भवन’ मंजूर करून उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
नगरपरिषदेच्या या निर्णयामुळे गडचांदूर परिसरातील दिव्यांग बांधवांमध्ये आशेचा नवा किरण निर्माण झाला असून, त्यांच्या विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.