By : Shankar Tadas
कोरपना : पावसात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून तालुक्यातील सावलहिरा येथील 20 वर्षीय युवक आनंद पुरुषोत्तम जोगी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 25 जून रोजी ही घटना घडली. तालुक्यात वीज विभागाचा भोंगळ कारभार सर्वत्र दिसून येतो. निव्वळ कंत्राटी मजूर किंवा रोजंदारीने काम करणाऱ्या च्या भरवशा वर काम केले जाते व कामा चा दर्जा निकृष्ट असतो. म्हणून थोडा ही पाऊस, वादळ झाले की खांब पडतात, तारा तुटतात, वीज पुरवठा विस्कळीत होतो. ग्रामीण भागात विजेचा लपंडाव नित्याची बाब झालेली आहे. अशातच योग्य पद्धतीने खांब न गाडल्याने तारा जमिनीवर पडल्या, मात्र वीज पुरवठा सुरू राहिला. दरम्यान, त्या तारांचा स्पर्श होऊन आनंद जोगी या युवकाला जीव गमवावा लागला. त्यामुळे नागरिकांत रोष व्यक्त होत असून या प्रकरणी लोकप्रतिनिधी नी त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. तालुक्यातील अनेक शिवारात वीज पुरवठा ठप्प असून पिकांच्या फवारणी साठी पाणी शेतात कोठून आणावे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.