लोकदर्शन बल्लारपूर👉मोहन भारती
चंद्रपूर, दि. २४ : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण लवकरच थांबणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आमदार निधीतून १९ ठिकाणी हातपंप बसविण्यासाठी ३४.३७ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यापूर्वीच २१ ठिकाणी हातपंप व सोलार पंप बसविण्यासाठी ७१.६२ लाखांची मान्यता मिळाली होती.
या निर्णयामुळे बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा आणि चंद्रपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. उन्हाच्या तीव्र तडाख्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेता, आ. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कामांमध्ये कवडजाई, बल्लारपूर, पोंभुर्णा, मुल आणि इतर गावांमध्ये हातपंप बसविण्याचा समावेश आहे.
या निर्णयामुळे पाणीटंचाईची समस्या दूर होऊन, नागरिकांच्या मूलभूत गरजांना दिलासा मिळणार आहे. नागरिकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या या पुढाकाराचे स्वागत केले आहे