गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुन्हा सुरू करावेत कॅम्प – गोंडवाना यंग टीचर्स संघटनेची सहसंचालकांकडे मागणी

लोकदर्शन👉मोहन भारती

राजुरा – गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाच्या प्रश्‍नांच्या निकाली निघण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कॅम्पचे आयोजन मागील काही महिन्यांपासून थांबविण्यात आले आहे. हे कॅम्प पुन्हा सुरू करावेत, अशी ठाम मागणी गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनने सहसंचालक (उच्च शिक्षण) नागपूर विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी गडचिरोली दौऱ्यावर असताना तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी गडचिरोली येथे दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी कॅम्प घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार काही काळ कॅम्प नियमित सुरू होते व विविध प्रश्‍न निकाली लागत होते. मात्र सध्या हे कॅम्प थांबले असल्यामुळे अनेक प्रलंबित प्रकरणांवर परिणाम झाला आहे.

गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव डॉ. विवेक गोर्लावर, डॉ. नरेंद्र हरणे आणि डॉ. उमेश इंदुरकर यांनी सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांच्याकडे निवेदन देत हे कॅम्प पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.

गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतल्यास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नागपूर कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागणे हे खर्चिक व वेळखाऊ ठरत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच महिन्यातून दोन वेळा गोंडवाना विद्यापीठातच कॅम्प घेण्याची गरज असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

संघटनेने अशा प्रकारचे कॅम्प महिन्यातून किमान दोन वेळा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे घेण्यात यावेत, जेणेकरून पदोन्नती, वेतन, प्रशासकीय मंजुरी, सेवा पुस्तक व इतर समस्यांवर वेळेवर कार्यवाही होऊ शकेल, असे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here