माणिकगड सिमेंट कंपनीत कामगाराचा मृत्यू – निलेश ताजने यांच्या पुढाकाराने तात्काळ आर्थिक मदत व पत्नीला रोजगाराचे आश्वासन

*🖊️ लोकदर्शन न्यूज 👉 ✍️ मोहन भारती*

गडचांदूर (ता. कोरपना) –
गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनीत काम करत असताना आज सकाळी श्री. वीनोद फकरू न्याहारे (वय अंदाजे ४५, रा. कुंभेझरी) यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच निलेश ताजने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व श्री. न्याहारे यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर निलेश ताजने यांनी पुढाकार घेऊन माणिकगड कंपनीच्या अधिकाऱ्यांशी व संबंधित ठेकेदारांशी तत्काळ चर्चा केली. त्यांच्या प्रयत्नातून पीडित कुटुंबाला ₹2,50,000/- (अडीच लाख रुपये) आर्थिक मदत मिळवून देण्यात आली.

तसेच अंत्यसंस्कारासाठी तातडीने ₹20,000/- (वीस हजार रुपये) रोख स्वरूपात मदत देण्यात आली.
या व्यतिरिक्त, मृत कामगाराच्या पत्नीला दोन महिन्यांच्या आत रोजनदारीवर कामावर घेण्याचे लेखी आश्वासन संबंधित ठेकेदाराकडून देण्यात आले, कारण त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे.

या सर्व सहकार्यामुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला असून, निलेश ताजने यांच्या संवेदनशीलतेचे परिसरात कौतुक होत आहे.

“संकटाच्या प्रसंगी निलेश ताजने यांनी दाखवलेली तत्परता आणि मदतीचा हात हा समाजासाठी प्रेरणादायक आहे,” अशी भावना ग्रामस्थ व सहकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

श्री. वीनोद न्याहारे यांच्या निधनामुळे कुंभेझरी व गडचांदूर परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.

🖊️ लोकदर्शन न्यूज साठी
✍️ मोहन भारती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here