लोकदर्शन राजुरा👉मोहन भारती
राजुरा (ता.प्र): महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावांचे सीमांकन व भुमी अभिलेख अद्याप तयार न झाल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यासंदर्भात राजुऱ्याचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, सदर १४ गावांचे सीमांकन करून भुमी अभिलेख तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संबंधित प्रस्ताव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या अवलोकनार्थ सादर केला गेला होता. त्यानंतर महसूल विभागाचे अप्पर सचिव यांनी भुमी अभिलेख संचालक, पुणे यांना पत्र पाठवले. मात्र जवळपास तीन वर्षांचा कालावधी उलटून गेला असतानाही आजतागायत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही.
ही गावं म्हणजे – मुकदमगुडा, तांडा, परमडोली, लेंडीजाळा, अंतापुर, येसापुर, भोलापठार (कोठा बु.), महाराजगुडा, पद्मावती, इंदिरा नगर, पळसगुडा, लेंडीपुरा व शंकरलोधी यांचा समावेश होतो. या गावांची जमीन मोजणी झाली असली तरी त्यानंतरचे रेकार्ड जसे की नकाशे, इजाफा, आकारबंद हे अद्याप तयार करण्यात आलेले नाहीत. भुमी अभिलेखाचा संपूर्ण डेटा विभागाच्या सॉफ्टवेअरमध्ये असूनसुद्धा पुढील कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष निर्माण झाला आहे.
माजी आमदार सुभाष धोटे यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात संबंधित विभागाला त्वरित आदेश देऊन सीमांकन व भुमी अभिलेख तयार करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून या गावांतील नागरिकांना त्यांचा कायदेशीर हक्क मिळू शकेल आणि सीमावर्ती गावांतील प्रशासकीय कामकाज सुरळीत पार पडू शकेल.
—
🗞️ संपर्क: लोकदर्शन न्यूज प्रतिनिधी –